Home स्थानिक जिल्ह्यात पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा:जिल्हा प्रशासनाचे सतर्कतेचे आदेश, शहर...

जिल्ह्यात पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा:जिल्हा प्रशासनाचे सतर्कतेचे आदेश, शहर आणि परिसरात विजेचा कडकडाट

18
0

अहमदनगर जिल्ह्यात 7 ते 9 मार्च या तीन दिवसाच्या कालावधीत विजेच्या कडकड्यासह वादळी वाऱ्याचा व गारपिटीच्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचे आदेश मंगळवारी 7 मार्चला जाहीर केले असून, या तीन दिवसांच्या कालावधीत नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन अहमदनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे.

दरम्यान अहमदनगर शहर व परिसरात जोरदार विजेच्या कडकड्यासह हलक्या पावसाने मंगळवारी रात्री हजेरी लावली, त्यामुळे वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला होता.

अहमदनगर शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मंगळवारी (7 मार्च) ला कमी अधिक प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला गहू भिजण्याच्या मार्गावर असून, जिल्ह्याच्या उत्तर भागातील संगमनेर, कोपरगाव सह अन्य तालुक्यात या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

गेल्या तीन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणनंतर सोमवार (6 मार्च )ला संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास शहरात हलक्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर मध्यरात्री देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. मंगळवारी पहाटे सहा वाजता कमी अधिक प्रमाणात शहरात पाऊस झाला. दुपारी देखील जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अवकाळीने हजेरी लावली. मंगळवारी रात्री शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील पावसाने हजेरी लावली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात 7 ते 9 मार्च या कालावधी विजेच्या कडकड्यासह वादळी वाऱ्याचा व गारपिटीच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

मेघगर्जनेच्या वेळी विजा चमकत असताना वादळी वारे सुरू असताना नागरिकांनी झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहू नये. वीज चमकत असताना विद्युत उपकरणाचा वापर करू नये. गारपिटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच नियोजन करावे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नजीकच्या तहसील कार्यालयात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे.